शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाला घरी बोलवण्याआधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी वाचा आणि मनातल्या शंका-कुशंका दूर करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 6:01 PM

1 / 14
गणपती हे एकमेव दैवत आहे, जे भक्तांच्या घरी येऊन त्यांचा पाहुणचार घेते. तो देव आहे म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाही. मनोभावे केलेली सेवा देवापर्यंत नक्कीच पोहोचते. फक्त अशा वेळी काही गोष्टींच्या बाबतीत आपले अज्ञान दूर केले की ज्ञानाचा लख्ख प्रकाश पडेल. मनातील शंका दूर होतील आणि उत्सवाचा निखळ आनंद घेता येईल. त्यासाठी गणेशोत्सवाशी संबंधित काही शंकांचे निरसन करून घेऊ.
2 / 14
मंगळवार १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होणारे परंतू त्या आधी अनेक गैरसमजुती पसरवल्या जात आहेत.याबद्दल ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, 'चुकीच्या माहितीवरविश्वअस ठेवू नये. मंगळवार १९ सप्टेंबर रोजी श्री गणेश मूर्ती स्थापना करावी. पूजा निर्भयतेने मनोभावे करावी. पूजासाहित्यात एखादी गोष्ट कमी असेल तर त्याजागी अक्षता अर्पण कराव्यात.' त्यांच्याकडून अशाच आणखीही काही गोष्टींचा आढावा घेतला आहे लोकमत प्रतिनिधी प्रज्ञा म्हात्रे यांनी.
3 / 14
(१) गणेशचतुर्थीच्या दिवशी जर चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो ही चुकीची समजूत आहे. चंद्रदर्शनाचा आणि चोरीचा आळ येण्याचा काहीही संबंध नाही.
4 / 14
(२) गणपती हा नवसाला पावतो हाही एक गैरसमज आहे. गणपती हा नवसाला पावत असता तर आपले सर्वच प्रश्न नवस बोलून सुटले असते. माणूस आजारी पडला की डाॅक्टरकडे जाण्याची गरज नव्हती . नवस बोलून दहशतवादीना ठार मारता आले असते. परिक्षेसाठी अभ्यास करण्याचीही जरूरी नसती. नवस बोलून यश मिळवता आले असते.
5 / 14
(३) वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणला पाहिजे. ही चुकीची समजूत आहे. कोणत्याही मुलाने किंवा सर्वांनी गणपती आणला तरी चालतो.
6 / 14
(४) पूर्वी पाच दिवस गणपती ठेवीत होतो. आता दिवस बदलून दीड दिवस गणपती पूजला तरी चालेल का ? असा प्रश्न अनेकजण विचारीत असतात. काहीही हरकत नाही. शास्त्रात कुठेही अमुकच दिवस गणपती पुजला पाहिजे असे लिहीलेले नाही. वृद्धापकाळामुळे किंवा इतर अडचणींमुळे गणपती आणणे बंद करायचे असेल तरी काहीही हरकत नाही.
7 / 14
(५) उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो हाही एक गैरसमज आहे. सोंड कुठे ठेवायची हा गणपतीचा प्रश्न आहे, आपला नाही. गणेशमूर्तीचे नीट निरीक्षण करा. गणपतीच्या डाव्या हातात मोदक किंवा लाडू असतो, म्हणून गणपतीची सोंड डावीकडे वळलेली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही देव हा कडक नसतोच. तो कृपाळूच असतो. तो कधीही कुणाचे वाईट चिंतीत नाही. कधी कुणाचे वाईट करीत नाही.
8 / 14
(६) घरात गरोदर महिला असेल तर गणेशमूर्तीचे विसर्जन करीत नाहीत. हेही चुकीचे आहे. जन्मणार्या अपत्याचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा काहीही संबंध नाही.
9 / 14
(७) काही लोक दरवर्षी उंच होत जाणार्या मूर्ती आणतात. हेही चुकीचे आहे. मूर्ती ही लहान असावी व भक्ती-श्रद्धा मोठी असावी.
10 / 14
(८) जर सुतक किंवा सुवेर आला तर काही लोक ते संपल्यावर मग गणेशमूर्ती आणून पूजा करतात. हेही चुकीचे आहे. त्यावर्षी गणपती आणायचाच नाही.
11 / 14
(९) काही लोक मागच्या वर्षी आणलेली गणेशमूर्ती यावर्षी विसर्जन करतात. यावर्षी आणलेली मूर्ती वर्षभर ठेवून पुढच्यावर्षी विसर्जन करतात. हेही योग्य नाही. गणेशमूर्ती ही मातीची असते. तिला बदलत्या हवामानामुळे तडा जाण्याची शक्यता असते.
12 / 14
(१०) महिलेने गणेशमूर्तीची पूजा केली तर चालते का ? असा प्रश्नही काही लोक विचारतात. महिलांनी गणेशपूजा करावयास अजिबात हरकत नाही.
13 / 14
(११) गणेशाला २१ मोदकांचा प्रसाद का अर्पण करतात? गणेशाला मोदक जास्त आवडतात. गणेश हा मातृभक्त होता. मातृदेवता २१ आहेत. म्हणून गणेशाला २१ अंक जास्त प्रिय आहे.
14 / 14
(१२) गणेशपूजा करताना पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा. मूर्ती मातीची असते. चुकून मूर्तीला इजा झाली तर घाबरू नये. लगेच उत्तरपूजा करून मूर्तीचे विसर्जन करावे. देव हा क्षमाशील असतो. चिंता/ काळजी करू नये. या घटनेमुळे काहीही वाईट घडणार नाही.
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी