Datta Jayanti 2022: मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा साजरी करा दत्त गुरुंची नवरात्र, पण कशी? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 06:47 IST
1 / 5योगिराज दत्त हे विरक्त रूप आहे. दत्तगुरुंच्या अवती-भोवती असलेले चार श्वान, हे चार वेदांचे प्रतिक आहे. पाठीशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचे प्रतिक आहे. स्वत: दत्तगुरु 'जटाजूट शिरी, पायी खडावा' घालून काषायवस्त्रधारी अर्थात भगवे वस्त्र धारण करून उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता आहे. 'शांत माया मूर्ती पहाटेसारखी...' कधीही पाहिले, तरी तेच भाव. नुसत्या दर्शनाने मन शांत होते. अशी मूर्ती त्रिगुणात्मक आहे आणि त्रैलोक्यीचा राणा आहे. त्यांच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश एकवटले आहेत. त्यांचे ध्यान करताना योगिजनांची समाधिस्थ अवस्था होते आणि 'आरती ओवाळिता हरली भवचिंता', अशी प्रचिती येते.2 / 5दत्तात्रेयाच्या मूर्तीला रोज अभिषेक करून दत्तसंप्रदायाप्रमाणे नऊ दिवस किमान नऊ घरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य दत्तात्रेयांना समर्पण करण्यात येत असता़े शिवाय नऊ दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्यात येते.3 / 5दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरुंचा अभिषेक करून त्या दिवशी दोन्ही वेळेस उपास केला जातो. दत्त जन्माचे कीर्तन ऐकले जाते. दत्तभजन केले जाते. सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. गुरुचरित्राचे पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरुंना पेढ्याचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो.4 / 5दत्त बावनी किंवा दत्तकृपेचा झरा म्हटला जातो. उत्सवात दत्ताचे भजन, पूजन, नाम:स्मरण केले जाते. दत्त जन्माच्या वेळेस दत्ताचा पाळणा म्हटला जातो. त्यानंतर दत्ताची आरती, पुष्पांजली म्हटली जाते. दत्त जन्माच्या उत्सवाची सांगता करताना ज्येष्ठ माता भगिनी दत्त मूर्तीची दृष्ट काढतात आणि दत्तगुरुंचे आशीर्वाद घेतात.5 / 5दत्त उपासनेची ज्याला ओढ लागते, त्याला अन्य कोणत्याही विषयात रस उरत नाही. त्या जीवाला उन्मनी अवस्था प्राप्त होते. भक्त कोण आणि भगवंत कोण, हे पाहणाऱ्याला कळत नाही. एवढी एकरूपता दिसून येते. हे सुख, ही अवस्था केवळ गुरुकृपेने प्राप्त होते आणि त्रैलोक्यराणाचे सान्निध्य प्राप्त होते.