1 / 5देवाच्या भेटीला जाता आले नाही म्हणून काय झाले? मनोभावे त्याला साद घातली तर तो घरी आपल्या भेटीला येईल. म्हणून आपल्या महाराष्ट्राचे लोकदैवत पांडुरंग त्याला आपल्या भेटीला बोलवायचे असेल, तर त्याच्यावर अढळ श्रद्धा आणि बोलवण्यात आर्तता हवी. नुसते वरवरचे म्हणणे नको. तर त्यात अगत्य भाव हवा.2 / 5कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर किंवा गाण्याचे, कीर्तन, भजनाचे कार्यक्रमही होत नाहीत. अशा वेळी इंटरनेटवरील संग्रहीत कथा, कीर्तन, भजन यांचा आस्वाद घ्यावा. तेही एकट्याने नाही, तर सहकुटुंब! नातवाला कीर्तनाला नेता आले नाही, तरी गोष्ट ऐकायला बस असे सांगून कीर्तन ऐकण्यासाठी इंटरनेटपुढे दोन तास खिळवून ठेवणे सहज शक्य आहे. एकादशीच्या दिवशी अशा एखाद्या तरी कीर्तन किंवा व्याख्यानाचा श्रवणलाभ जरूर घ्या.3 / 5आपल्याकडे मोबाईलमध्ये, संगणकात किंवा इंटरनेटवर हजारो गाण्यांचा संच असतो. एकादशीच्या दिवशी सकाळपासून भक्तीगीते लावून घरातल्या घरात प्रतिपंढरपूर साकारता येईल. त्यातही तो आवाज पं. भीमसेन जोशी यांचा असेल तर क्षणार्धात मन `इंद्रायणी काठी' पोहोचलेच म्हणून समजा.4 / 5आषाढी एकादशी आणि चतुर्मास व्रताचा आरंभ म्हणून नवे रोप रुजवता येईल. घर किंवा इमारतीच्या आवारात तसेच आपल्या आसपासच्या परिसरात वृक्षारोपण केल्यास पुढील चार महिने त्याच्या मशागतीची जबाबदारी घेता आणि निभावता येईल. त्यातही ते रोप तुळशीचे असेल, तर अतिशय उत्तम!5 / 5आषाढी एकादशीनिमित्त एखाद्या गरजू दांपत्याला घरी बोलावून किंवा शिधा अर्थात कोरडे धान्य देऊन त्यांचे आशीर्वाद घेता येतील. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतल्याचे तुम्हालाही समाधान मिळेल.