नारायणचाळ रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था
परभणी : येथील महात्मा फुले यांचा पुतळा ते नारायण चाळ या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले आहेत. डांबरी रस्ता उखडला असून, नागरिकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छतेची कामे
परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गवत वाळून घाण साचली होती. मनपाच्या स्वच्छता विभागाने या भागात साफसफाई केली असून, हा परिसर आता स्वच्छ दिसू लागला आहे.
जि.प. इमारतीचे काम संथगतीने
परभणी : शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम संथगतीने होत आहे. सध्या हे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, पुढील कामे अतिशय संथगतीने होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांचे स्थलांतर लांबणीवर पडत आहे.
जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री सुरू
परभणी : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही जिल्ह्यात मात्र गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलीस प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वी गुटखा विक्रीविरुद्ध मोहीम सुरू केली होती. त्या काळात ही विक्री बंद झाली असली तरी मोहीम थंड झाल्यानंतर गुटखा विक्री वाढली आहे.
पोलिसांनी वाढविली दिवसाची दस्त
परभणी : पोलिसांनी दिवसाही गस्त वाढविली आहे. पोलीस प्रशासनाला काही महिन्यांपूर्वी नवीन सहा वाहने उपलब्ध झाले असून, या वाहनांच्या साह्याने दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यांवर गस्त घातली जात आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी स्वरुपाच्या किरकोळ घटनांना आळा बसला आहे.
स्टेडियम परिसरात स्वच्छतागृह उभारण्याची मागणी
परभणी : येथील स्टेडियम परिसरामध्ये स्वच्छतागृह नसल्याने नागरिक आणि व्यावसायिकांची कुचंबणा होत आहे. या परिसरात स्वच्छतागृह उभारल्यास नागरिकांची गैरसोय दूर होऊ शकते. सध्या शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात असून, त्या अंतर्गत स्टेडियम परिसरात स्वच्छतागृह उभारावे, अशी नागरिकांची मागणी आहे.