परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी जिल्ह्यात लढा उभारण्यात आला असून, या अंतर्गत १ सप्टेंबर रोजी जिल्हाभरातील युवकांनी धरणे आंदोलन करीत या मागणीसाठी एकजुटीचे दर्शन घडविले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी लढा उभारला आहे. यापूर्वी जिल्ह्यात याच मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून १ सप्टेंबरपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील युवकांनी या लढ्यासाठीची एकजूट दाखवून दिली. बुधवारी युवकांच्या वतीने आंदोलन केले जाणार असल्याने सकाळपासूनच युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकाळी ११ वाजेपासूनच जिल्हाभरातून युवक दाखल होण्यास प्रारंभ झाला. बँड वाजवत आणि ‘शासकीय महाविद्यालय आमच्या हक्काचे..’ अशा घोषणा देत युवक या भागात दाखल झाले. त्याचप्रमाणे परभणी शहरातील विविध भागातून रॅली काढत व घोषणाबाजी करीत युवकांनी आंदोलनात सहभाग नोंदिवला. आंदोलनात सहभागी होणाऱ्या युवकांची संख्या लक्षात घेता, पोलीस प्रशासनाला जागोजागी वाहतूक वळवावी लागली.
दुपारी साधारणत: १२.३० वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात प्रत्यक्ष आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी खा.बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, माजी महापौर प्रताप देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान, रिपब्लिकन सेनेचे विजय वाकोडे, लालसेनेचे कॉ.गणपत भिसे, भाई कीर्तीकुमार बुरांडे, भाकपचे कॉ.राजन क्षीरसागर, इरफानूर रहेमान खान, स्वराजसिंह परिहार, संजय गाडगे आदींसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. युवकांना मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.