चारठाणा येथील सुधाकर भगवानआप्पा क्षीरसागर यांनी त्यांच्या शेतात लागवड करून काढलेली ४४ पोते हळद घरासमोरील एमएच २२ एएम २१५३ क्रमांकाच्या त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॅलीमध्ये १७ एप्रिलच्या मध्यरात्री ९ च्या सुमारास भरून ठेवली होती. १८ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या ट्रॅक्टरमधील दोन पोते गायब असल्याचे त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी आजूबाजूला विचारणा केली असता माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे चुलत भाऊ शिवप्रसाद क्षीरसागर यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता एका दुचाकीवर दाेन अज्ञात चोरट्यांनी त्याच्या ट्रॅक्टरमधील हळदीचे २ पोते चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात १८ एप्रिल रोजी फिर्याद दिली. त्यात ६० किलो वजनाचे ८ हजार ४०० रुपयांचे हळदीचे पोते चोरट्यांनी चोरून नेल्याचे नमूद केले आहे. त्यावरून २ अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरासमोरील ट्रॅक्टरमधून चोरले हळदीचे पोते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST