परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज उपचारासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून रुग्ण येत असतात. त्यांच्यावरील उपचाराच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली यंत्रमामग्री रुग्णालय प्रशासनाला राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यातील काही यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीदरम्यान दिसून आले. गरीब व गरजू रुग्णांसाठी दिलेली यातील काही यंत्रसामग्री वापरात नसल्याने ज्या उद्देशाने ती जिल्हा रुग्णालयास देण्यात आली, तो उद्देश फोल ठरताना दिसून येत आहे. नेतेमंडळींचे दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांची उदासीन भृमिका यासाठी कारणीभून असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
सीटीस्कॅनला सुट्टी
बुधवारी रुग्णालयातील यंत्रसामग्रीची पाहणी केली असता येथील सीटी स्कॅन कक्षाला कुलूप असल्याचे दिसून आले. शासकीय सुट्ट्यावगळता इतर दिवशी ही मशीन सुरू राहत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी येथे रुग्ण आल्यास त्याला खासगी सीटी स्कॅन केंद्रावर जाण्याशिवाय पर्याय राहत नाही.
एक एक्स रे मशीन बंद; एक अडगळीत
या रुग्णालयात एका एक्स रे मशीनचा एक पार्ट नादुरुस्त झाल्याने ही मशीन बंद आहे. हा पार्ट दुरूस्तीला पाठविण्यात आल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. येथे नव्याने आलेल्या २ मशीन सुरू आहेत;परंतु जुनी एक एक्स रे मशीन अडगळीत ठेवून देण्यात आल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.
डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ४ महिन्यांपासून बंद
शहरातील नानलपेठ भागात असलेल्या नेत्र रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया कोरोनामुळे गेल्या ४ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नेत्र शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध असलेली यंत्रसामग्री वापराअभावी बंद आहे.
१४ व्हेंटिलेटर्सही वापराविनाच
परभणी येथील जिल्हा रुग्णालयासाठी पीएम केअर फंडातून देण्यात आलेले १५ पैकी तब्बल १४ व्हेंटिलेटर वापरात नसल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी शनिवारी केलेल्या पाहणीत आढळून आले होते. यावेळी त्यांनी येथील अधिकाऱ्यांना जाबही विचारला होता.