गंगाखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह परजिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद राहिल्या. परिणामी ४ हजार हेक्टरवरील काढणीस आलेले टरबूज, खरबजू, भाजीपाला बाजारपेठ अभावी जागेवरच सडून जात आहे. त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील या शेतकऱ्यांचे १० काेटींहून अधिकचे नुकसान झाले आहे. याकडे राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गंगाखेड तालुक्यातून इतर शहरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी टरबूज, खरबूज व भाजीपाल्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे कमी दिवसांमध्ये जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून सरसावले आहेत. त्यामुळे याहीवर्षी शेतकऱ्यांनी १ हजार ५०० हेक्टरवर टरबूज, खरबूज आणि २ हजार ५०० हेक्टरवर वांगे, टोमॅटो, मिरची, पालक, गाजर, चुका आदी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बाजारपेठा ठप्प पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करून काढणीस आलेला भाजीपाला बाजारपेठ अभावी जागीच सडून जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देऊन पंचनामा करत आर्थिक नुकसान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
अर्ध्या एकर शेतामध्ये टोमॅटो, वांग्यांची लागवड केली. या पिकांवर मोठा खर्च केला. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. परिणामी मोठा फटका सहन करावा लागत आहे.
बाळासाहेब राठोड, भाजीपाला उत्पादक शेतकरी