जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक गावे कोरोनामुक्त झाली असून या गावांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही. जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत, अशा गावांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वेक्षण करावे, अशा सूचना राज्य स्तरावर मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक शिक्षण विभागाने देखील नियोजन करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात ११० गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सध्या नाही. त्यामुळे या गावांमधील सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या या गावांत पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली झाल्या. या गावांत कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू होतील, अशी आशा होती.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने दोन दिवसांपासून राज्य शासनाने राज्यातील निर्बंध कडक केले आहेत. परभणी जिल्ह्यात अनलॉकच्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णपणे खुले असलेले व्यवहार सोमवारपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत चालणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा निर्बंध लागू झाल्याने कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे राज्य स्तरावरून आदेश असले तरीही या गावांमध्ये शाळा सुरू होण्याची आशा मावळली आहे.
ऑनलाइन शिक्षणावर भर
कोरोनाच्या अनुषंगाने पुन्हा निर्बंध लागू झाल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांनी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था होऊ शकत नाही, अशा ठिकाणी अभ्यास गटाच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातून केले जात आहेत.
पाचवी ते आठवीचे एकूण विद्यार्थी
१,४४,७७५
पाचवी : ३७३००
सहावी : ३६२६३
सातवी : ३५६४३
आठवी : ३५५६९
शाळांची संख्या
जिल्हा परिषद : ९३७
खासगी अनुदानित : ४३७
विनाअनुदानित : ३३१