परभणी : संचारबंदी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, सलग सातव्या दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून १ लाख ९७ हजार २०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. असे असतानाही नागरिक मात्र घराबाहेर पडण्याची टाळत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. याशिवाय मास्कचा वापर केला जात नसल्याने अशा नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
रविवारी १९ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबवण्यात आली. त्यात मास्कचा वापर न करणाऱ्या २६७ नागरिकांकडून ४८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे फिजिकल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी नागरिकांकडून २ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूण ३६ दुचाकी वाहने जप्त केली असून, दिवसभरात ४० दुकानदारांकडून १ लाख १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १५६ वाहनधारकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, या वाहनधारकांकडून ३३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सव्वापाचशे नागरिकांचे घेतले स्वॅब
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, अनेक जण कारण नसताना घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.
रविवारी एकूण ५२५ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३२, नवामोंढा ६६, कोतवाली ३०, सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३, मानवत १०, पाथरी ७९ आणि गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५० नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्यात केल्या आहेत.