परभणी: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आ.सुरेश वरपूडकर यांच्या महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून २१ पैकी ११जागा जिंकत दिग्गजांचे अंदाज चुकविले आहेत.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रारंभीपासूनच चर्चेचा विषय झाली आहे. परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत अनेक आजी-माजी आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आदींनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रारंभी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होण्याची चर्चा होती. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत हे चित्र कायम होते. उमेदवारी परत घेण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाली. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून ॲड.स्वराजसिंह परिहार व दत्तात्रय मायंदळे या दोघांनीही अर्ज दाखल केले. परिहार यांना वरपूडकर यांचे तरमार्यदळे यांचे आ.बाबाजानी दुर्राणी यांचे समर्थन होते. दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली नाही. त्यामुळे दुर्राणी यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वरपूडकर गटासाठी सोपी वाटणारी निवडणूक कठीण होते की काय? अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अशातच सोनपेठ गटातून माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांचे बंधू गंगाधर बोर्डीकर यांनी माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या विरोधात जोरदार प्रचार चालविला. मतदानाच्या दिवशी या दोन्ही गटात तुंबळ हाणामारीही झाली. त्यामुळे ही निवडणूक आणखी प्रतिष्ठेची झाली होती. निकालाअंती या ठिकाणी विटेकर यांनी केवळ एका मताने बोर्डीकर यांचा पराभव केला. यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. दुसरीकडे वरपूडकर गटातील अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला. इतर शेती संस्था गटातून सलग निवडून येणारे विजय जामकर यांचा भाजपाचे महनगराध्यक्ष आनंद भरोेसे यांनी पराभव केला. विशेष म्हणजे जामकर यांच्या विजयासाठी शिवसेनेचे आ. राहुल पाटील यांनी चांगलीच तागद लावली होती. तरीही जामकरांचा पराभव झाला. आ. पाटील यांनी औढ्यातून राजेश पाटील गोरेगावकर यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका निभावली, हे विशेष होय. तसेच कळमनुरीत माजी खा. शिवाजी माने यांनी सुरेश वडगावकर यांचा पराभव केला. वडगावकर यांच्या धरसोडवृत्तीमुळे त्यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. नंतर शिवसेनेत गेले. शिवसेनेतीलच ॲड. माने यांच्या सोबत त्यांची लढत झाली. त्यात वडगावकरांचा पराभव झाला.
भाजपाच्या नेत्यांची लक्षणीय कामगिरी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालम गटातून भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य गणेश रोकडे यांनी लक्षणीय विजय मिळविला. ते बोर्डीकर किंवा वरपूडकर या दोन्ही पैकी एकाही गटाकडे निवडणुकीसाठी गेले नाहीत. अपक्ष म्हणून निवडणूक लढवून त्यांनी लक्ष्मणराव दुधाटे यांचा २०मतांनी पराभव केला. बँकेतील बहुमत काठावर आहे, त्यामुळे रोकडे यांच्या मताला चांगलेच महत्व आले आहे. याशिवाय भाजपाचे पूर्णेतील पदाधिकारी बालाजी देसाई हे वरपूडकर गटाकडून बिनविरोध निवडून आले आहेत; परंतु, एकवेळा त्यांचा फोटो बोर्डीकरांसोबत तर एकवेळा वरपूडकरांसोबत पहावयास मिळाला. त्यामुळे त्यांचीही भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे.