पालम : तालुक्यातील तीन गावांमध्ये आरक्षण सोडती अंतर्गत ज्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरपंचपद आहे, त्या प्रवर्गाचे सदस्य गावात नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. त्यामुळे उपसरपंचच या गावांचा कारभार चालविणार आहेत. पालम तालुक्यात दिनांक ८, १० व १२ फेब्रुवारी असे तीन दिवस ५३ गावांमधील सरपंच व उपसरपंचांच्या निवडी पूर्ण करण्यात आल्या आहेत. पेठशिवणी, फळा व उक्कडगाव या तिन्ही गावांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला सदस्य नाही. आरक्षण सोडतीत या तिन्ही गावांचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले होते. या प्रवर्गातील महिला सदस्यच उपलब्ध नसल्याने सरपंच, उपसरपंच निवडीवेळी अधिकाऱ्यांचे पथक उपसरपंचांची निवड करून परतले. आता याबाबतचा अहवाल तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहेत. त्यानंतर येथील सरपंचपदाच्या अनुषंगाने निर्णय होणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तूर्त तरी तिन्ही गावांचे सरपंचपद रिक्तच राहणार आहे.
तीन गावांचा कारभार सरपंचाविना चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST