तालुक्यातील जवळपास १७० गावातील नागरिक किराणा, कापड, भुसार, साहित्य खरेदीसाठी तसेच कृषिमाल विक्रीसाठी शहरात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा दिवसापासून शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरामध्ये साधारणतः कापड, किराणा, जनरल स्टोअर्स व अन्य व्यवसायाची मिळून संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे. या सर्व व्यापाऱ्यांकडे तीन हजारपेक्षा जास्त मजूर काम करतात. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न लाॅकडाऊन लागल्यामुळे गंभीर बनला आहे.
जिंतूरमध्ये कपड्याची ४० दुकाने आहेत. या दुकानात जवळपास ४०० मजूर काम करतात. या व्यवसायाचा दररोजचा २५ लाखाचा व्यवहार ठप्प झाला आहे. मागील पंधरा दिवसापासून बारा कोटी रुपयांचा फटका केवळ कपडा विक्रीला बसला आहे. जिंतूरमध्ये अडीचशे पेक्षा जास्त किराणा दुकानदार आहेत. या दुकानदारांकडे ८०० पेक्षा जास्त मजूर काम करतात. बाजारपेठेत ग्राहक नसल्याने दररोज सकाळी काही वेळ दुकाने उघडली जात आहेत. परिणामी या व्यवसायालाही फटका बसला आहे. काही ठिकाणी मजूर कपातीचे धोरण व्यावसायिकांनी अवलंबिले आहे तर काही ठिकाणी मजुरांना अर्धा पगार दिला जात आहे. या व्यवसायाची दररोजची उलाढाल वीस ते तीस लाख आहे.
जिंतूर बाजार समितीत ३० आडत दुकान आहेत. या दुकानात साधारणता दीडशे ते दोनशे कामगार काम करतात. ही दुकाने मागील पंधरा दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे आडत व्यापाऱ्यांची दररोजची ५० लाखाची उलाढाल ठप्प आहे. मागील ४० दिवसात जवळपास २० कोटी रुपयांचा फटका आडत दुकानदारांना बसला आहे. जिंतूर शहरात कापूस खरेदी करणारे ६ जिनिंग प्रेसिंग असून यात पाचशेपेक्षा जास्त मजूर काम करतात. या व्यवसायालाही मोठा फटका बसला. व्यवसायाची दररोजची उलाढाल पन्नास लाखांच्या जवळपास आहे. याशिवाय शहरात ४० जनरल स्टोअर्सची दुकाने असून या दुकानावर दोनशे मजूर काम करतात. मागील पंधरा दिवसांपासून ही दुकाने बंद आहेत. जनरल स्टोअर्सची उलाढाल सहा लाखांच्या जवळपास आहे. याशिवाय शहरातील औद्योगिक परिसरात वेगवेगळ्या पंधरा ते वीस उद्योगातून तीनशे ते ३५० कामगार काम करतात. या उद्योगांची दररोजची उलढाल ४० लाखांच्या जवळपास आहे. कामच नसल्याने मजूर वर्ग बेरोजगार बनला आहे.
कृषिमाल बाजारपेठेत आणता येत नसल्याने संपूर्णपणे व्यापार ठप्प झाला आहे. आवक नसल्याने मजुरांना काम नाही. शेतकऱ्यांकडे माल आहे मात्र बाजारपेठेपर्यंत आणता येत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
- ॲड. मनोज सारडा, आडत व्यापारी, जिंतूर.
किराणा बाजारपेठेवर ग्राहक नसल्याने मंदीचे सावट आहे. दररोज लागणाऱ्या कोणत्याही वस्तूची भाव वाढ झाली नाही किंवा बाजारपेठेत पुरवठा व्यवस्थित होत असल्याने वस्तूची टंचाई नाही. मात्र ग्राहक नसल्याने व्यावसायिक हवालदिल बनला आहे
- श्रीनिवास तोष्णीवाल, किराणा व्यवसायिक, जिंतूर.
लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद असून यातून दररोज लाखोंचा फटका उद्योजकांना बसत आहे. लाईट बिल, पाणीपट्टी व इतर खर्च व्यावसायिकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. शिवाय बँकेचे भरमसाठ व्याज वाढत असल्याने लॉकडाऊनमुळे उद्योजक हवालदिल झाला आहे.
- रमण तोष्णीवाल, उद्योजक, जिंतूर.
शेतकऱ्यांकडे तूर, गहू, ज्वारी, चना मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे आणता येत नाही. माल विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने अनेक शेतकरी व्यापाऱ्याकडे आगाऊ पैशासाठी तगादा लावत आहेत. अनेक दिवस बँकाही बंद राहात आहेत. या आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी बँकेने आता आडत व्यापाऱ्यांना व्याजातून सूट द्यावी.
- राजेश देवकर, अध्यक्ष, आडत व्यापारी असोसिएशन.