परभणी : गणेशोत्सवात सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करून वेगळेपणा जपला जातो, दे दिसून येते. यातही समाजभान जपून अनावश्यक खर्चाला फाटा देत परभणीतील परसावत नगर व्हीआयपी गल्ली भागातील श्री वक्रतुंड गणेश मित्र मंडळाने यावर्षी पहिल्यांदाच स्वखर्चातून एका जोडप्याचा विवाह सोहळा आयोजित केला होता. यामुळे या गणेश मंडळाने वेगळेपणा निर्माण केला आहे.
परभणी शहरातील परसावत नगर व्हीआयपी गल्ली भागात श्री वक्रतुंड गणेश मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे १९ वे वर्ष आहे. दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, पारायण, याशिवाय अन्य समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन या मंडळाकडून केले जाते. मंडळाने पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. यंदा या सर्व आयोजनामध्ये आगळावेगळा सामाजिक उपक्रम म्हणून मंडळाने अनावश्यक खर्चाला फाटा देत स्वखर्चातून एका जोडप्याचा विवाह सोहळा आयोजित केला होता.
संसार उपयोगी साहित्य सुद्धा भेटशुक्रवारी हा विवाह सोहळा गणेश मूर्ती स्थापन झालेल्या परिसरात मंडपात विधिवत पद्धतीने लावण्यात आला. यावेळी वर आणि वधू यांच्याकडील काही नातेवाईक, कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील रूमणा जवळा येथील वैष्णवी लक्ष्मणराव कदम आणि बीड जिल्ह्यातील धानोरा रोड येथील शुभम संभाजी पवार यांचा शुभमंगल सोहळा येथे पार पडला. मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या या वधू-वरांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करून त्यांना संसार उपयोगी साहित्य सुद्धा मंडळाने दिले.
अनोखा उपक्रम चर्चेतविवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. पारायण मिरवणूक पारंपरिक ढोल, ताशा, लेझीम पथकाच्या उपस्थितीत काढण्यात आली. त्यामुळे परभणीकरांसाठी हा मंडळाचा उपक्रम आगळावेगळा ठरला आहे.