प्रमोद साळवे, गंगाखेड - गाव तसं चांगलं पण तिथे जायला यायला चांगला रस्ताच नाही... रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला; त्याकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळ नाही... यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी अखेर रविवारी पहाटेपासून याच रस्त्याच्या चिखलात लोळत अर्ध नग्न आंदोलन सुरू केले. ही वेळ ओढावली गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी ग्रामस्थांवर...
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही टाकळवाडीकरांना पांगरी फाटा ते टाकळवाडी या दीड किलोमीटरच्या रस्त्याचा हक्काचा मार्ग मिळालेला नाही. सातत्याने मागणी केल्यावरही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रविवारच्या पहाटे ६ वाजता अर्धनग्न आंदोलन केले. भर पावसात चिखल तुडवत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात वृद्ध पुरुष, महिला, आबालवृद्ध आणि दिव्यांग नागरिकही सहभागी झाले. टाकळवाडीकरांच्या म्हणण्यानुसार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे मागण्या करूनही रस्ता मिळत नसल्याने त्यांनी हा कटाक्षी निर्णय घेतला आहे.
आंदोलनात समाजसेवक सोपानराव नागरगोजे, प्रशांत माने, तुकाराम डोईफोडे, नारायण डोईफोडे, सुरेश होडगीर, नरसिंग डोईफोडे, मारोतराव डोईफोडे, तसेच दिव्यांग महिला रंजना माने, दिव्यांग दत्तराव डोईफोडे, तुळसाबाई होडगीर, लक्ष्मीबाई डोईफोडे, विष्णुकांता डोईफोडे, देवळबाई डोईफोडे यांसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले.
अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस मार्ग नाव देणार...
गावकऱ्यांनी सांगितले की, रस्ता मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. उद्या सोमवारी टाकळवाडीकर पांगरी फाटा – टाकळवाडी या रस्त्यावर ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्ग’ असा फलक लावून आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करणार आहेत.