लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दहावी आणि बारावीच्या निकालाची मूळ प्रत आणि शाळा सोडल्याचा दाखला वेळेत न मिळाल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करू शकले नाहीत. परिणामी आय. टी. आय.ची प्रवेश नोंदणी घटली आहे.
जिल्ह्यात आयटीआयसाठी २ हजार २९८ जागा असून, आतापर्यंत ४ हजार २४६ अर्ज कन्फर्म झाले आहेत. त्यामुळे यातून किती विद्यार्थी आय. टी. आय.ला प्रवेश घेतील, याविषयी साशंकता आहे. गतवर्षी जिल्ह्यात ६ हजार ९३५ अर्ज कन्फर्म झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत प्रवेश अर्ज घटल्याने आता आय. टी. आय.च्या वतीने प्रवेश प्रोत्साहन अभियान राबिवले जात आहे. त्यास प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद
जिल्ह्यातील आय. टी. आय. प्रवेशासाठी मागील वर्षी ६ हजार ९३५ विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झाले होते.
यावर्षी मात्र ही संख्या ४ हजार २००वर येऊन ठेपली आहे.
आयटीआयकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दहावी, बारावीचा निकाल लागला असला तरी विद्यर्थ्यांना निकालपत्र उशिराने मिळाले. काही जणांना अजूनही निकालपत्र मिळाले नाही. त्यामुळे नोंदणीला अडचण येत आहे.- शिक्षणतज्ज्ञ
बारावी उत्तीर्ण विद्यार्थीदेखील आय. टी. आय.ला प्रवेश घेतात. सीबीएसई बोर्डाचा निकाल यावेळेस उशिराने लागला. त्यामुळे आय. टी. आय.कडे येणारा विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला.- शिक्षण तज्ज्ञ