सोनपेठ : कमी किमतीत सोने देण्याचा बहाणा करीत एकास मारहाण करून रोख ६ लाख रुपयांना फसविल्याची घटना ३ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोविंदवाडी शिवारात घडली आहे.
माहूर तालुक्यातील बोरड येथील रहिवासी असलेला सागर गंभीर राठोड हा नेहमीच माहूर येथील एका महाराजाच्या संपर्कात होता. या महाराजांना एक व्यक्ती कमी किमतीत सोने देण्याबाबत वारंवार फोन करीत असे. मात्र, महाराजांकडे पैसे नसल्याने त्यांनी ही बाब सागर राठोड यांना सांगून त्यांना संबंधित व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दिला. सागर राठोड यांनी या व्यक्तीस आठ दिवसांपूर्वी फोन केला होता. त्यानंतर परत या व्यक्तीने २ जानेवारी रोजी सागर यांना फोन केला. सोने पाहिजे असेल तर गंगाखेड येथे येण्याचे सांगितले. ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सागर राठोड हे गंगाखेड येथे आले. त्यावेळी त्यांना मोटारसायकलवर आलेल्या एका व्यक्तीने संपर्क साधून आमच्या पाठीमागे येण्यास सांगितले. सागर राठोड हे कार घेऊन मोटारसायकलच्या मागे गेले. परळी- गंगाखेड रस्त्यावरील गोविंदवाडी येथे एका शेतात त्यांना उभे करण्यात आले. याच वेळी चौघांनी सागर यांच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्यांना मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सागर राठोड यांच्याकडील ४ लाख ३५ हजार रुपये, २१ ग्रॅमचे सोने आणि मोबाइल असा ६ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. याप्रकरणी सागर राठोड यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने तपास करीत आहेत.