परभणी : बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, जिल्ह्यातील २४ पैकी सहा कोरोना केअर केंद्रात रुग्णच नसल्याने हे केंद्र बंद करावी लागली आहेत. विशेष म्हणजे सहापैकी तीन केंद्र परभणी शहरातील आहेत.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सक्रिय झाली. पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळेस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे पाच महिने जिल्हावासीयांना काळजीत काढावे लागले. मात्र आता हा संसर्ग कमी झाला असून, रुग्णांची संख्या घटल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्णांची नोंद झाली. या दोन महिन्यात रुग्णांना बेड मिळणेही दुरापास्त झाले होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली असून, मोठ्या प्रमाणात बेड रिक्त झाले आहेत, तर काही केंद्र रुग्णांअभावी बंद करावे लागले.
कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात २४ कोरोना केअर केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रांमध्ये दोन हजार १०२ खाटांची सुविधा प्रशासनाने केली होती. मात्र रुग्णांची संख्य लक्षणीयरीत्या घटल्याने अनेक केंद्रांतील खाटा रिक्त आहेत. सध्या केवळ २७१ रुग्ण कोरोना केअर केंद्रात उपचार घेत आहेत. त्यामुळे उर्वरित खाटा रिक्त आहेत. परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू, झरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कस्तुरबा गांधी विद्यालय, पाथरी, लॉयन्स क्लबचे कोरोना केअर सेंटर, कारेगाव आणि पूर्णा येथील कोरोना केअर केंद्रात एकही रुग्ण उपचार घेत नसल्याने हे केंद्र बंद आहेत.
रुग्ण नसल्याने कोरोना केअर केंद्र बंद करावे लागत असल्याने ही बाब जिल्हावासीयांसाठी समाधान देणारी ठरत आहे.
ग्रामीण भागातच संसर्ग अधिक
सध्याची कोरोनाची स्थिती पाहता, शहरातील तीन कोरोना केअर केंद्रांपैकी केवळ एकाच केंद्रात रुग्ण उपचार घेत आहेत. महानगरपालिकेच्या कल्याण मंडपम् येथील कोरोना केअर केंद्रात १०० खाटांची सुविधा आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी १७ रुग्ण उपचार घेत असून, ८३ खाटा रिक्त आहेत. उर्वरित दोन केंद्रांत एकही रुग्ण नाही, तर ग्रामीण भागातील कोरोना केअर केंद्रात मात्र उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
सेलू तालुक्यात ६८ रुग्ण
सेलू तालुक्यात सध्या कोरोनाचे ६८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाच्या कोविड केंद्रात १७ आणि बळीराजा कोविड केंद्रात ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. बाजार समितीच्या केंद्रात एकही रुग्ण उपचार घेत नाही.
गंगाखेड तालुक्यात २६ रुग्ण
गंगाखेड तालुक्यात सध्या २६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात उपजिल्हा रुग्णालयात सात रुग्ण आहेत. त्यातील चार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तसेच मुलींच्या वसतिगृहातील कोरोना केंद्रात १९ रुग्ण उपचार घेत आहेत.