परभणी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृती अवमानानंतर दोन दिवस तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. बुधवारी झालेले आंदोलन चिघळल्याने शहरात विविध ठिकाणी व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानाचे सोबतच साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते. यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने जमावबंदी, निमसंचारबंदी लागू करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. गुरुवारी सकाळपासून शहरातील व्यवहार पूर्वपदावर आल्याने परिस्थिती आटोक्यात आहे.
शहरातील सर्वच भागांमध्ये एसआरपीच्या तुकड्या तैनात करून पोलिसांनी शहरातून रूट मार्च सुद्धा काढला. शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाकडे मदतीचे साकडे घातले आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली महापालिका आणि महसूल यंत्रणांकडून पथके नियुक्त करून प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी गुरुवारी दुपारी सुरुवात झाली आहे. शहरातील विविध भागात बुधवारी झालेल्या आंदोलनाने परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली होती. बुधवारी सायंकाळी नंतर शहरात कठोर पावले उचलत अनेकांची धरपकड मोहीम सुरू केली. यासह शहरात निम संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला. गुरुवारी सकाळपासून शहरातील सर्वच भागांमध्ये हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.
व्यापाऱ्यांनी मांडली आक्रमक भूमिका शहरातील मुख्य बाजारपेठ, डॉक्टर लेन, स्टेशन रोड वेगवेगळ्या ठिकाणी नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांनी शिष्टमंडळ समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार संदीप राजापुरे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याशी थेट संवाद साधून आक्रमक भूमिका मांडली. त्वरित पंचनामे करून योग्य ती मदत मिळवून देत संबंधित नुकसान करणाऱ्यांवर कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
अंबादास दानवे येणार परभणीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे परभणी शहरातील झालेल्या आंदोलन आणि तनावपूर्ण परिस्थितीनंतर पाहणी करण्यासाठी गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास दाखल होणार आहेत. मुख्य बाजारपेठेत विविध ठिकाणी व्यापाऱ्यांशी संवाद साधून ते जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे समजते.