लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना आवश्यक असलेली औषधे व इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांचा मुक्काम वाढला असून, बाहेर उपचारासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र परभणी शहरात पाहायला मिळत आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २९ हजार ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार करून डॉक्टरांनी त्यांना बरे केले आहे. सद्यस्थितीत ६ हजार ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य कर्मचारी व डॉक्टर जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. मात्र, आवश्यक असलेली इंजेक्शन व औषधे वेळेवर मिळत नसल्याने कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. बेड मिळविण्यासाठीही कसरत करावी लागत आहे.
नातेवाईकांची घालमेल
मागील आठ दिवसांपासून परभणी शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. मला फेव्हीपिरॅव्हीर औषधाची गरज आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडे या औषधाचा पुरवठा झाला नसल्याने मला हे औषध मिळाले नाही. त्यामुळे काळजीत भर पडली. मात्र, डॉक्टरांनी पर्यायी औषधी देत बरे केले.
परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये मी कोरोना संसर्गावर उपचार घेतले आहेत. औषधांबरोबरच सुविधांचाही याठिकाणी अभाव आहे. त्यामुळे उपचार घेताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देऊन सुविधा वाढविण्याची गरज आहे.
जिल्ह्यात दररोज ३०० ते ३५० रुग्णांना रेमेडेसिविर इंजेक्शनची गरज भासते. मात्र, प्रशासनाकडून १५० ते १६५ इंजेक्शन पुरवली जातात. त्यामुळे उर्वरित रुग्णांना उपचार घेण्यासाठी औषधांचा तुटवडा जाणवतो. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन शासनाकडे रेमडेसिविरसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
कोरोना आजारावर उपचार घेत असताना मला डॉसिलीझुपॅप या औषधाची गरज भासली. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ ते उपलब्ध करून माझी गरज भागवली. त्यामुळे औषधांची गरज भागवली असली, तरी बेड मिळवण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागली.