परभणी : संचारबंदी काळातही येथील बाजारपेठेतील काही दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी बाजारपेठ भागात फिरून दुकानदारांना कडक शब्दात समज दिली. यापुढे दुकाने सुरू राहिली तर दंड आकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली असताना याविषयी फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील बाजारपेठ भागात गुरुवारी बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली. परंतु, काही व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू केली होती. उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठ भागात फिरून सुरू असलेल्या दुकानदारांना कडक शब्दात समज दिली. विशेष म्हणजे, याच काळात बाजारपेठेतून वाहनधारकांचा मुक्त संचार सुरू होता. संजय कुंडेटकर यांनी या वाहनधारकांना थांबवून त्यांच्या फिरण्याची कारणे विचारली. अनेकांनी किरकोळ कारणे त्यांच्यासमोर सांगितली. अत्यावश्यक कारणाशिवाय रस्त्यावर फिरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारादेखील यावेळी कुंडेटकर यांनी दिला. येथील शिवाजी चौक, गुजरी बाजार, क्रांती चौक अष्टभुजा देवी मंदिर परिसर आदी भागात फिरून त्यांनी ही कारवाई केली. या कारवाईनंतर मात्र बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली तसेच काहीकाळ या भागातील वाहतूकही कमी झाल्याचे दिसून आले.