परभणी : होळी आणि धुलीवंदनचा सण विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. मात्र, परभणीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे सन २०२२ पासून दरवर्षी शिवीमुक्त आणि व्यसनमुक्त होळी, धुलीवंदन साजरे केले जाते. शुक्रवारी सकाळी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात या उपक्रमात सहभागी युवकांनी एकत्र येत विविध ठिकाणी जनजागृती करून शिवीमुक्त होळी अभियान राबविले. हिंदू संस्कृतीतील होलिका आणि रंगोत्सव अर्थात याला ग्रामीण भाषेमध्ये धुळवड असे म्हणतात. या निमित्ताने अनेक पद्धतीने हा सण साजरा होतो. परंतु, या सणाला अनेक वर्षांपासून सणाच्या निमित्ताने अनेक जण होलिका दहन करून रंगोत्सव साजरा करतात. चुकीच्या पद्धतीने सण साजरा करण्याचा एक पायंडा पडला आहे. यामध्ये व्यसन करणे. तसेच शिवी देऊन हा सण साजरा करण्यात येतो. यामुळे सामाजिक शांतता आणि चुकीच्या प्रथा पडत आहेत. यासाठी अनेक वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने तरुणांमध्ये चांगला संदेश जावा आणि सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्याकरिता या सणाचा आनंद घ्यावा, समाजापुढे चांगला आदर्श ठेवण्यासाठी ही संकल्पना सर्वप्रथम सन २०२२ मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांनी आचरणात आणून समाजाला चांगला पायंंडा पाडण्याचा प्रयत्न केला. अनेक तरुण युवकांनी या गोष्टी अमलात आणून प्रतिसाद देत आहेत. विविध ठिकाणी जाऊन या युवकांनी दिवसभर जनजागृती केली. सामान्य नागरिक तसेच प्रशासन यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
शिवीमुक्त धुलीवंदनचा परभणीत उपक्रम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे चार वर्षांपासून संकल्प
By राजन मगरुळकर | Updated: March 14, 2025 12:14 IST