परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण निघण्यास एप्रिल २०२० मध्ये सुरुवात झाली. यानंतर पहिल्या टप्प्यात एप्रिल ते जुलै या कालावधीत लॉकडाऊन होते; तर आता या वर्षात जानेवारी-मे २०२१ या पाच महिन्यांत मागील तीन महिने दुसरे लॉकडाऊन लावण्यात आले होते. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय ठप्प होते. या कालावधीत काहींच्या नोकरी गेल्या; तर काहीजणांचे ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू होते. तसेच या कालावधीत घरातील सर्व सदस्य, पती-पत्नीसुद्धा घरी होते. एरव्ही पती-पत्नी तसेच घरातील आई-वडील आणि अन्य सदस्यांचा संवाद कामाच्या धबडग्यात जास्त होत नव्हता. लॉकडाऊनने घरातील वाढलेली कामे, जबाबदारी, लहान मुले यांची शाळा बंद असल्याने ते घरातच होते. याचा ताण महिला वर्गावर झाला. यातून सासू-सासरे, पती यांच्या पत्नीकडून असलेल्या कामाच्या अपेक्षा वाढल्या. तसेच किरकोळ कारणावरून होणारे छोटे-मोठे वाद आणि भांडण यांचा परिणाम काही घरांतील पती-पत्नीच्या नातेसंबंधावर झाला. यातून शारीरिक, मानसिक तसेच पैशांची मागणी करीत छळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांची नोंद पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे झाली आहे. दुसऱ्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात किरकोळ कारणाने विष कालवल्याचे अर्जात नमूद केलेल्या तक्रारीवरून दिसून येते.
भरोसा सेलमध्ये मार्च २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी - ९६६
दुसऱ्या लॉकडाऊनच्या कालावधीत आलेल्या तक्रारी - २९६
५७ पती-पत्नींचे भांडण सोडविले
मार्च २०२० ते मे २०२१ मध्ये एकूण ९६६ तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यांतील ४१३ प्रकरणे निकाली काढण्यात आली; तर जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत २९६ तक्रारी आल्या आणि त्यांतील ५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
असा आहे ‘भरोसा सेल’
जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यांतील कोणतीही महिला या भरोसा सेलमध्ये येऊन आपली तक्रार करून म्हणणे मांडू शकते. यानंतर पती-पत्नी यांचे म्हणणे एकूण घेतल्यावर जर त्यांची समुपदेशनाने तक्रार मागे घेत नांदण्याची तयारी असेल तर त्यांना मार्गदर्शन केले जाते आणि त्या दोघांची नांदण्याची इच्छा नसेल तर आलेल्या अर्जावर पुढील कारवाई करीत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला जातो. येथे कार्यरत असलेले पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता मोराळे, शकुंतला हेकाडे, पोलीस कर्मचारी राजेश शिंदे, सीमा चाटे, आशा लांडगे, शिवाजी घुगे यांच्याकडून समुपदेशन केले जाते.
पैसा हेच प्रमुख कारण
भरोसा सेलकडे आलेल्या विविध तक्रार अर्जांत सर्वाधिक प्रकरणे ही केवळ पैशांचे वाद, व्यवसाय, नोकरी गेल्याने जाणवत असलेली आर्थिक टंचाई व घरातील सदस्यांशी किरकोळ कारणाने होत असलेल्या वादाचा समावेश आहे. घरातील सदस्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने पती-पत्नी यांचे वाद होतात. काही प्रकरणांत पतीचे वागणे, बोलणे, चारित्र्यावर संशय घेणे आणि दारू पिऊन पत्नीला मारहाण करणे ही कारणेही यातील काही अर्जात समाविष्ट आहेत.
अ- माहेरी पाठवीत नसल्याचे कारण देत एका महिलेने पती तसेच घरातील सासू, सासरे यांच्याविरुद्ध अर्ज दाखल केला होता. यावर १२ मार्च ते २८ मेच्या दरम्यान भरोसा सेलकडे आलेल्या अर्जावर सर्व सदस्यांचे समुपदेशन केले आणि त्यानंतर हे प्रकरण निकाली काढण्यात आले. आता हे पती-पत्नी नांदत आहेत.
ब- पतीचा नेहमी पत्नीवर असलेला संशय, पत्नीला दारू पिऊन मारहाण करणे आणि मुलांकडे दुर्लक्ष करणे या कारणातून आलेले एक प्रकरण सध्या सुरू आहे. यावर दोघांचे म्हणणे ऐकून घेत पुढील प्रक्रिया सुरू आहे.
महिलांनी घरगुती अत्याचार सहन न करता त्यांचे म्हणणे आमच्या भरोसा सेलकडे मांडावे. ज्यांना तक्रार करायची त्यांनी टोल फ्री क्रमांक किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
- प्रणिता मोराळे, सहायक पोलीस निरीक्षक, पथकप्रमुख.