सेलू तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तालुका प्रशासनाने हा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलली आहेत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सेलू तालुक्यात १६ ते २० मेदरम्यान प्रत्येक गावात जाऊन आटीपीसीआर चाचणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार तहसीलदार बालाजी शेवाळे, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, डी. एस. अहिरे, विस्तार अधिकारी सुधाकर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सरपंच, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, आशा वर्कर यांच्या माध्यमातून जवळपास ८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १६ मे रोजी ८ तर १७ मे रोजी १३ गावांमधील जवळपास १ हजार २६६ तर सेलू शहरातील २६६ आरटीपीसीआर व ७१ ॲंटिजन चाचणी करण्यात आली आहे. ही मोहीम २० मेपर्यंत तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. याशिवाय ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम तालुक्यातील ९३ गावांमध्ये राबवली जात असल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
या गावांमध्ये झाली आरटीपीसीआर चाचणी
सेलू तालुक्यातील वालुर, सोन्ना, चिमणगाव, राहा, गोंडगे पिंपरी, गिरगाव, बोरकिनी तर १७ मे रोजी तळतुंबा, मोरेगाव, हादगाव, गोरेगाव, देऊळगाव गात, खवणे पिंपरी, लाडनांद्रा, खुपसा, गुळखंड, केमापूर, पार्डी या गावात ही मोहीम राबविण्यात आली आहे.