गहू, ज्वारी, आंब्याचे मोठे नुकसान
परभणी : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी या पिकांसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले असून, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक विस्कळीत
परभणी : येथील गंगाखेड रोड भागात रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. या भागात एका बाजूने सिमेंट कॉंक्रीट रस्ता तयार करण्यात आला असून, दुसऱ्या बाजूने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. शहर हद्दीतील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
कोरोनाच्या अहवालांना विलंब
परभणी : जिल्ह्यात आरोग्य विभागाने तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली असली तरी प्रत्यक्षात त्याचे अहवाल वेळेत प्राप्त होत नाहीत. त्यामुळे स्वॅब नमुना दिलेल्या नागरिकांना अहवालासाठी तीन ते चार दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. मात्र, त्या प्रमाणात प्रयोगशाळेतून अहवाल देण्याची गतीही वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहर स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष
परभणी : शहरात मागील काही दिवसांपासून मनपा प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्य प्रभागांमध्ये नाल्या तुंबल्या असून, जागोजागी घाण साचली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर प्रशासनाने कोरोना नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील बसपोर्टचे काम संथगतीने सुरू
परभणी : शहरातील बसस्थानक परिसरात बसपोर्ट उभारण्याचे काम अनेक दिवसांनंतर सुरू झाले आहे; परंतु या कामाला अजूनही गती प्राप्त झाली नाही. एसटी महामंडळ प्रशासनाने बसपोर्टच्या कामासाठी निधी उपलब्ध करून कामाला गती प्राप्त करून द्यावी. मुदतीत हे काम पूर्ण करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास
परभणी : धर्माबाद-मनमाड या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून काही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत आहेत. परभणी, सेलू, पूर्णा या स्थानकांवर तिकीट तपासणीस उपलब्ध नसल्याने या प्रवाशांचे फावत आहे. कमी अंतराचा प्रवास करताना रेल्वेने तिकीट आरक्षण करून प्रवास करणे परवडत नसल्याने काही प्रवाशांनी हा मधला मार्ग निवडला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.