शहर मनपाने ५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत चालू वर्षापर्यंतच्या करावरील शास्ती माफीची योजना लागू केली. त्यानुसार ३१ ऑगस्ट हा कर भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त व त्यांच्या अंगरक्षक आवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध मराठवाडा नगरपालिका व मनपा कामगार कर्मचारी युनियनने नोंदविला. यासाठी मंगळवारी मनपातील व प्रभाग समित्यांचे कामकाज ठप्प होते. दुपारी २ वाजेपर्यंत कल्याण मंडपम येथील कार्यालयाला कुलूप होते. या ठिकाणी अनेक नागरिक बंद कार्यालय पाहून परतले. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास एकत्र जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह काही जणांनी ही बाब नगरसेवक व प्रशासनाच्या कानावर घातली. तेव्हा दुपारी ३.३० च्या सुमारास अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता वसीम पठाण, शिवसेनेचे गटनेते चंदू शिंदे, रितेश झांबड यांनी या ठिकाणी भेट देऊन एकत्र जमलेल्या नागरिकांची कर भरण्यासाठी सोय व्हावी म्हणून कर निरीक्षकांना बोलावून घेतले. त्यानंतर येथील कामकाज सुरू झाले. मात्र, अनेकांना दुपारपर्यंत कार्यालयात खेटे मारावे लागले.
प्रभाग समिती अ, बमध्ये गर्दी
कल्याण मंडपम येथील कार्यालय दुपारपर्यंत बंद होते. तसेच प्रभाग समिती अ आणि बमध्ये दुपारपर्यंत कार्यालय बंद असल्याने शुकशुकाट होता. मात्र, दुपारी ३ नंतर यातील प्रभाग समितीची दोन्ही कार्यालय सुरू होताच नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत येथील कामकाज सुरू होते. मात्र, दुपारी येथेही अनेक जण खेटे मारून परतले होते.
ऑनलाइन कर भरणा अनेकांनी टाळला
मनपाने कर ऑनलाइन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनेकांच्या कराच्या वार्षिक आकारणीमध्ये अतिरिक्त रक्कम जोडून आली होती. ही रक्कम कशाची हे कळत नसल्याने रक्कम कमी करून त्याचा ऑफलाइन भरणा करण्यासाठी अनेकांनी ऑनलाइन कर भरणे टाळले. यामुळे गर्दी झाली होती.