पिंगळी येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ
पिंगळी : येथील खाकरेबाग येथे २९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. सप्ताह कालावधीत काकडा, पारायण, भागवतकथा निरूपण, कीर्तन, हरिपाठ आदी कार्यक्रम होत आहेत. या सप्ताहास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
परभणी : शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर मोठेमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मनपा प्रशासनाने काही भागांतील खड्डे बुजविले आहेत. मात्र, शिवाजीनगर ते प्रशासकीय इमारत, वसंतराव नाईक यांचा पुतळा ते सुपर मार्केट या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
उद्यानातील लॉन सुकले
परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानात नियमित देखभाल केली जात नसल्याने येथील लॉन वाळले आहे. मागच्या काही महिन्यांपासून उद्यान विकासाची कामे ठप्प आहेत. सध्या उद्याने खुली करण्यात आली आहेत. मात्र, तुटलेल्या खेळण्या, वाळलेले लॉन यामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
साथरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ
परभणी : जिल्ह्यात सध्या वातावरणात बदल झाला आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी गारवा निर्माण होत आहे. या विचित्र वातावरणामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रत्येक वसाहतीत साथरोगाचे रुग्ण आढळत आहेत.
गंगाखेड रोडवरील पुलांची कामे संथगतीने
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, आता दुसऱ्या बाजूने सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. मात्र, या रस्त्यावरील पुलाची कामे सध्या ठप्प आहेत. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील पुलाची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
मास्कच्या वापराला नागरिकांचा फाटा
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, मास्क वापरण्यास नागरिक टाळाटाळ करीत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा धोका कमी झाला असला, तरी अद्याप तो टळलेला नाही. मात्र, तरीही नागरिक मास्कचा वापर करणे टाळत आहेत. त्याचप्रमाणे फिजिकल डिस्टन्सचेही ठिकठिकाणी उल्लंघन होत आहे. प्रशासनाने या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.