राजन मंगरूळकर
परभणी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या घटनेनंतर बुधवारी परभणी शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये बुधवारी सकाळी परभणी-पिंगळी मार्गावर साडेनऊच्या सुमारास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याशिवाय परभणी शहरातील काळी कमान, पाथरी रोड भागातील महामार्गावर सुद्धा हे चक्काजाम आंदोलन टायर जाळून करण्यात आले.
परभणीत मंगळवारी सायंकाळी झालेल्या या अवमानाच्या घटनेनंतर मध्यरात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण शहरामध्ये तणावपूर्ण शांतता होती. पोलीस यंत्रणेकडून संबंधित इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, नागरिक, युवक संतप्त झाल्याने त्यांच्याकडून आरोपीला कडक शिक्षा व्हावी, याची मागणी करीत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून शहरात सुद्धा ठीकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि विविध महामार्गावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा प्रशासनाला निवेदन देत संबंधित घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
महिला, युवती, युवकांचा सहभाग
शहरातील विविध भागातील कॉलनी वसाहती मधून सुद्धा महिला युवती आणि युवक यांच्यासह अनेकांनी रस्त्याने मोर्चा काढून रॅली काढून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीचा अवमानाचा निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी देत ठीकठिकाणी फेरी मारल्या.