मनरेगांतर्गत मागील आठवड्यात ६८३ कामे सुरू होती. या कामांवर ५ हजार ८९२ मजुरांना काम मिळाले आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक १५० कामे सुरू असून, त्यावर १ हजार ४२७ मजूर काम करतात. इतर तालुक्यांमधील मजुरांची संख्या ३ आकड्यांत आहे. कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण, वन विभाग या विभागांच्या माध्यमातून अनेक कामे सुरू केली जाऊ शकतात. विशेष म्हणजे विकासकामांनाही मनरेगातून सुरुवात होऊ शकते. मात्र, यंत्रणांच्या उदासीनतेमुळे मोजकीच कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचा फटका स्थानिक मंजुरांना बसत आहे.
बांधकाम विभागाची उदासीनता
शासकीय यंत्रणांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता दिसून येत आहे. या विभागाच्या माध्यमातून रस्त्याची कामे हाती घेतली जाऊ शकतात. प्रत्यक्षात मागील आठवड्यात एकाही कामाला सुरुवात झाली नाही. इतर विभागांतही कामांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. वन विभागाने रोपवाटिकेची केवळ ४ कामे सुरू केली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटिकेची दोन कामे सुरू केली आहेत, तर रेशीम विभागाची १४६, कृषी विभागातून फळबाग लागवडीची १२० कामे सुरू आहेत, तर इतर यंत्रणांची जिल्ह्यात २७२ कामे सुरू आहेत.
तालुकानिहाय कामे
गंगाखेड ७२
जिंतूर ७६
मानवत १०९
पालम १०
परभणी ९५
पाथरी १५
पूर्णा १००
सेलू २३०
सोनपेठ ३७