कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक राहण्याची शक्यता आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविली असून, या लाटेचा सामना करण्यासाठी येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात चौथ्या मजल्यावर केवळ मुलांसाठी ४०० ऑक्सिजन बेड उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आणखी किती बेड उपलब्ध होतील, या अनुषंगानेही शुक्रवारी बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
ऑक्सिजन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात १७ टन ऑक्सिजनची दररोज मागणी होती. ती भागविण्यासाठी ४ ऑक्सिनज प्रकल्प मंजूर असून ते कार्यान्वित केले जातील.
ऑक्सिजन बेड
जिल्ह्यात सध्या ८२० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. बालकांसाठी आणखी ४०० बेड उभारले जातील. तसेच इतर ठिकाणीही बेड उभारणीचे नियोजन आहे.
कोविड रुग्णालये
शहरातील कोविड रुग्णालये आणखी सक्षम केली जाणार आहेत. केअर सेंटरपेक्षाही कोविड रुग्णालयात उपचारांवर भर देण्याचे नियोजन आहे.
औषधी
मुलांसाठीच्या स्वतंत्र औषधींचा साठा वाढवावा लागणार आहे. त्यानुसार लागणाऱ्या औषधी साठ्याचे शुक्रवारी नियोजन होणार आहे.
आज टास्क फोर्सची बैठक
संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन नियोजन करण्यासाठी शुक्रवारी टास्क फोर्स आणि बाल रोग तज्ज्ञांची बैठक आयोजित केली आहे. त्यातून चर्चेअंती निर्णय घेतला जाईल.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी