केकरजवळा येथील रमेश शिवाजी कदम यांनी त्यांच्या घरात पावसाचे पाणी पाझरत असल्याने भिंतीवर मेणकापडाचे चवाळे टाकले होते. २२ जुलैरोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ते घराबाहेर थांबले असता, त्यांचा चुलत भाऊ अच्युत जगन्नाथ कदम हा तेथे आला व त्याने रमेश कदम यांना घराच्या भिंतीवर लावलेले चवाळे काढून टाक, त्यामुळे बोळीत पाणी येत असल्याचे सांगितले. यावेळी रमेश कदम यांनी सकाळी चवाळे काढून टाकतो, असे म्हणाल्यानंतर आरोपी अच्युत कदम याने बाजूच्या सरपणातील लाकूड उचलून रमेश यांच्या बाजूला उभे असलेले त्यांचे वडील शिवाजी अंबादास कदम यांच्यावर हल्ला केला. लाकडाने बेदम मारहाण केली. तसेच लाथा- बुक्क्याने मारहाण केली. यावेळी रमेश कदम यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत रमेश कदम यांनी याबाबत मानवत पोलीस ठाण्यात २३ जुलैरोजी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी अच्युत जगन्नाथ कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
पावसाच्या पाण्यावरून पुतण्याची चुलता, भावास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST