परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या काेविड रुग्णालय परिसरातील ऑक्सिजन प्रकल्पाच्या दुरुस्तीदरम्यान, कॉम्प्रेसरची पाईप गरम होऊन मोठा आवाज होऊन धूर निघाल्याने एकच गोंधळ उडाला. २२ मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, हा प्रकल्प बंद असल्याने कुठलाही अनर्थ घडला नाही.
कोविड रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास या प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे प्रकल्प बंद होता. दुरुस्ती झाल्यानंतर प्रकल्प सुरू करण्यात आला. याच दरम्यान, कॉम्प्रेसरच्या पीव्हीसी पाईपमधून मोठा आवाज झाला. त्यानंतर धुराचे लोट उडाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तातडीने प्रकल्प बंद करण्यात आला. प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या प्रकल्पावर एकाही रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा नव्हता. त्यामुळे कुठलाही अनर्थ झाला नाही. दरम्यान, पीव्हीसी पाईपमधून धूर निघाल्याने एकच गोंधळ उडाला. तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच खा. बंडू जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांनीही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.