मागील वर्षी शहरात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. मे महिन्यापासून शहरवासीयांना या योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र ही योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी नव्या योजनेवर नळ जोडणी घेणे अपेक्षित आहे. वारंवार आवाहन करून आणि दरांमध्ये सूट दिल्यानंतरही नळ जोडणीला शहरातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. डिसेंबर महिन्यात नवीन नळ जोडणी देण्याची मोहीम मनपा प्रशासनाने राबविली होती. मात्र जानेवारीपासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्याने ही मोहीम ठप्प पडली आहे.
आता तर शहरात कोविडच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मनपा प्रशासन त्यातच गुंतले असून, नळ जोडणी घेण्यासाठी साधे आवाहनही केले जात नाही. त्यामुळे ही मोहीम सध्या ठप्प पडली आहे.
शहरात साधारणत: ७५ हजार मालमत्ता असून, त्यापैकी किमान २५ ते ३० हजार नागरिकांनी नळ जोडण्या घ्याव्यात, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.