पाथरी : शहरातील आदर्श नगर भागात एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पाथरी पोलिसांनी रोखला. ही कारवाई गुरुवारी ( दि. 22 ) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मुला-मुलीच्या नातेवाईकांसह भटजी, फोटोग्राफर, केटरर्सवर यांच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि महिला बाल विकास कार्यालय यांच्याकडे परभणी चाईल्ड लाईफ लाईनचे केंद्र समन्वयक संदीप बेडसुरे यांच्याकडून पाथरी शहरातील आदर्श नगर येथे अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होत असल्याची माहिती मिळाली. कक्षातील अधिकारी आम्रपाली पाचपुंजे यांनी सकाळी पाथरी पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पाथरी पोलीस पथकासह आदर्श नगर येथील विवाहस्थळ गाठले. येथील १७ वर्षीय मुलीचे वडवणी तालुक्यातील एका मुलासोबत विवाह सुरू होता. वधू अल्पवयीन असल्याने विवाह तातडीने रोखण्यात आला. पोलिसांनी मुलगा आणि मुलीच्या नातेवाईकांसह भटजी,फोटोग्राफर, केटरर्स अशा ११ जणांच्या विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये कृष्णा कांबळे, कांताबाई तिखे, राधाकिशन तिखे, निकिता कांबळे, अशोक शितळकर, मुक्ताबाई कांबळे, रामेश्वर कांबळे, गणेश मस्के, शामराव शंकरराव जोशी ( पाथरी ), राहुल पारखे, अशोक घोलप ( रा. चिंचवडगाव ता वडवणी) यांचा समावेश आहे. पोलीस नाईक शाम काळे पुढील तपास करत आहेत.