परभणी : महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या वतीने आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या माध्यमातून आगामी दोन वर्षांत परभणी, हिंगोली आणि बीड या तीन जिल्ह्यातील हवेतील प्रदूषणाचा अभ्यास केला जाणार आहे. २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
या उद्घाटन कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, तहसीलदार संजय बिराजदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी जयंत कदम, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, प्रबंधक विजय मोरे, प्रकल्प समन्वयक डॉ. बापूसाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमांतर्गत परभणी, वसमत आणि परळी शहरातील हवेमध्ये प्रदूषणाची पातळी यंत्राच्या माध्यमातून तपासत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २४ तासाच्या मानांकनाच्या मर्यादित आहे की नाही याचा अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुदानातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे शहरातील सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजनडाय ऑक्साईड व धूलिकण या हवा प्रदूषण घटकाचे मोजमाप केले जाणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार या प्रदूषकाची मात्रा ८० मायक्रो ग्रॅम प्रतिमीटर घन व धूलिकणाचे पीएम २.५ मानांकन ६० व पीएम-१० चे मानांकन १०० मायक्रो ग्रॅम प्रतिमीटर घन अपेक्षित आहे. पीएम २.५ धुलीकण हे श्वसननलिकेतून फुफ्फुसात प्रवेश केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. यासंदर्भाने अभ्यास करून मार्च २०२३ मध्ये राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ.व्ही.एम. मोटघरे, उपप्रादेशिक अधिकारी स्नेहा कांबळे व उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, चंद्रकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भोसले, प्रा.आर.डी. मस्के, प्रा. गिरीश देशमुख, श्रीनिवास काळे व मुंजा मुंडे आदी हा प्रकल्प राबवित आहेत.