परभणी : कोरोनाचा संसर्ग असला तरी काही पोलीस अधिकारी, कर्मचारी वाममार्गाने वसुली करीत असल्याचे एसीबीच्या दोन कारवायांवरून स्पष्ट झाले. या दोन कारवायांत एक अधिकारी आणि चार कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत.
शासकीय काम करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अधिकची रक्कम मागत असेल तर त्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करतो. जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत एसीबीने १० कारवाया केल्या असून, त्यात गृह विभागाच्या विरोधातील दोन कारवायांचा समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत एकूण १० कारवाया केल्या आहेत. त्यात गृह विभागाच्या (पोलीस) २, महसूल विभागातील ४, सहकार विभागातील १, महावितरणच्या अधिकाऱ्याविरुद्ध १ आणि एक कारवाई जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये लोकसेवकाने कमीत कमी एक हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतची लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, कोरोना काळात एकीकडे सर्व व्यवहार ठप्प असताना दुसरीकडे लाचेच्या रकमेत मात्र मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यास अटक
सेलू येथील एका प्रकरणात १० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. या वर्षातील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.
लाच मागितली जात असेल, तर येथे संपर्क साधा.
लोकसेवकांकडून शासकीय कामासाठी लाच मागितली जात असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार करण्याची मुभा आहे. लाचेची मागणी होत असल्यास तक्रारदार ०२४५२-२२०५९७ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकावर तक्रार करू शकतात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.