परभणी : जिल्ह्यात मटका, जुगार हे अवैध धंदे सुरू असून पोलिसांनी याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शनिवारी दिवसभरात तीन ठिकाणी छापे टाकून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख महेबूब शेख महेमुद (रा.गौस कॉलनी) हा मोटारसायकलवरून फिरून नागरिकांकडून कल्याण नावाच्या जुगाराचे आकडे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे ६फेब्रुवारी रोजी पोलिसांच्या पथकाने आरोपीविरुद्ध कारवाई केली. त्याच्याकडून नगदी रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा ५२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
शहरातील इठलापूर मोहल्ला भागातील एका दुकानावर पोलिसांनी छापा टाकला असता विठ्ठल राजाराम मोराळे हा कल्याण नावाचा मटका चालवित असताना मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याच परिसरात तिसरी कारवाई करण्यात आली. या भागात सार्वजनिक रस्त्यावर बसून आरोपी लोकांकडून जुगाराचे आकडे घेत असताना मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, पोलिसांनी त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा १९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिन्ही कारवाया पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, परीवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्र, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, विष्णू भिसे, अरुण कांबळे यांच्या पथकाने केली.
जिल्ह्यात अवैध धंदे वाढले
जिल्ह्यात अवैध धंदे पुन्हा वाढले आहेत. मटका, जुगार अड्ड्यासह अवैधरीत्या दारु विक्री होत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अवैध धंद्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे युवक वर्ग वाममार्गाला लागत आहेत. पोलीस प्रशासनाने ग्रामीण भागातही मोहीम सुरू करून अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी केली जात आहे.