परभणी : नदीपात्रातून वाळूचा उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २३ मे रोजी जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा अद्यापही थांबलेला नाही. पूर्णा, गोदावरी आणि दुधना नदीपात्रातून दिवस-रात्र वाळू उपसा केला जात आहे. पोलीस प्रशासन याविरुद्ध कारवाया करीत आहे. रविवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर गावाजवळ टिप्पर (क्र. एमएच ४३ यू ६३७६) वाळू घेऊन जात असताना पोलिसाना दिसून आला. टिप्परचालकाला थांबविले असता त्याच्याकडे महसूल भरल्याची पावती नव्हती. टिप्परमध्ये सव्वादोन ब्रास वाळू आढळली. पोलिसांनी हा टिप्पर जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विपीन केंद्रे यांच्या फिर्यादीवरून टिप्परचालक अमीन खान गबरू खान पठाण (रा. कानडखेड, ता.पूर्णा) व टिप्परमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर परिसरातच सरकारी दवाखान्यातसमोर काही अंतरावर आणखी एक टिप्पर पोलिसांनी जप्त केला आहे. या टिप्परमधून (क्र. एमएच २७ एक्स ७५२०) वाळू वाहतूक केली जात होती. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पोलिसांनी हा टिप्पर जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शिवाजी गुट्टे यांच्या फिर्यादीवरून चालक सचिन रमेश जाधव (रा.निळा, ता. पूर्णा) व टिप्परमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणाचा तपास चुडावा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंडित करीत आहेत.