देवगावफाटा : कोरोना संकटाच्या काळात शेतकरी आडचणीत आला असतांना सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले येथील सुशिक्षित बेरोजगार युवकाने आपल्या शेतात पेरूच्या १५० झाडापासून दिड लाख रूपये उत्पन्न मिळवीले. पेरूने या युवकाचा शेती व्यवसायातील गोडवा वाढवला आहे.
डिग्रस बरसाले येथील मकुंद बंडू बरसाले या युवकाने बीएड् पूर्ण केले. मात्र नोकरी मिळाला नाही. परंतु, हिंमत न हारता पारंपरिक पीक शेतीऐवजी फळबाग शेती करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी ४ गुंठे जमिनीत १० बाय १० फुटावर सुपर गोल्ड या जातीची सिताफळाची ११० रोपाची लागवड केली.त्यापासुन चांगले उत्पन्न मिळाले. त्यानंतर ३ वर्षापूर्वी १५ बाय १५ फुटावर लऊनऊ ४९ जातीच्या पेरुंच्या १५० रोपांची लागवड केली होती. तीन वर्षात या ठिकाणी कापूस व हरभरा ही आंतरपीक घेतली. त्यातुन चांगले उत्पन्न मिळाले. यासाठी शेंद्रीय खताचा वापर केला होता. या पेरूच्या बागेतून डिसेंबर महिन्यापासून उत्पन्न निघण्यास सुरू झाले. जानेवारी अखेरपर्यंत नांदेड, परभणी, सेलू, मंठा या बाजारपेठेमध्ये पेरू पाठवले. यातून १ लाख ६० हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. यासाठी तोडणी मजुर व वाहन व ईतर खर्च २० हजार रूपये आला तर खर्च वजा जाता १ लाख ४० हजार उत्पन्न मिळाले. यापुढे या पेरू बागेतुन १५ वर्ष उत्पन्न मिळेल असे मुकुंद बरसाले यांनी सांगितले. या पेरू विक्रीतून या सुशिक्षित युवकाला संसारात चांगलच हातभार मिळाला आहे. त्यामुळे यापुढेही विविध फळ शेती अधिक प्रमाणात करण्याचा निर्णय बरसाले यांनी घेतला आहे. तसेच येत्या काळात मिरचीची लागवड करून भरघोस नफा मिळवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
अत्यल्प पाणी व कमी खर्चात फळबाग शेतीमधुन अधिक उत्पन्न मिळल्याने मला नौकरी न लागल्याचे दुख वाटत नाही. उलट सुशिक्षित बेरोजगार युवक फळबाग शेती व व्यवसायाकडे वळले तर त्यांची निश्चितच त्याची आर्थिक उन्नती होईल अशी मला खात्री आहे.
-मुकुंद बंडू बरसाले, शेतकरी, डिग्रस बरसाले.