परभणी : हवेतील ऑक्सिजन वेगळा करून तो रुग्णांसाठी वापरण्याचा प्रकल्प परभणी जिल्ह्यासाठी मंजूर झाला असून, येत्या दोन - तीन दिवसात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांची संख्याही अधिक असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने जिल्हा रुग्णालय, आयटीआय परिसरातील कोविड हॉस्पिटल आणि जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये लिक्विड ऑक्सिजन यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेत बाहेरून लिक्विड ऑक्सिजन खरेदी करून तो रुग्णांपर्यंत उपलब्ध करून दिला जातो; परंतु रात्यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातही ऑक्सिजनचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लिक्विड ऑक्सिजन मिळण्यासाठीही प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा जम्बो सिलिंडर, ड्युरो सिलिंडर आणि रेग्युलर सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध केले जात आहे.
जिल्ह्यातील या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता हवेतला ऑक्सिजन वेगळा करून तो रुग्णांसाठी उपलब्ध करण्याचा प्रकल्प येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प यापूर्वी परळी येथे मंजूर झाला होता. परंतु परभणी जिल्ह्यातील स्थिती लक्षात घेऊन तो परभणीसाठी मंजूर करण्यात आला आहे. विजेच्या साह्याने चालणाऱ्या यंत्रणेच्या सहाय्याने हवेतील ऑक्सिजन वेगळा करून तो साठविण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
दहा केएल ऑक्सिजन निर्मितीची क्षमता
येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून एका दिवसात दहा केएल ऑक्सिजन निर्माण करून साठवणूक करण्याची क्षमता आहे. त्यामुळे दररोज १० केएल ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार आहे. या ठिकाणी निर्माण झालेला ऑक्सिजन आयटीआय आणि जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठीही कसा वापरता येईल, या दृष्टीने ही प्रशासन प्रयत्न करीत आहे.
केवळ २२.४ केएल ऑक्सिजन उपलब्ध
येथील जिल्हा रुग्णालय आणि आयटीआय हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी २० केएल लिक्विड ऑक्सिजन सिलिंडर उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे १० केएल ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता असलेले सिलिंडर जिल्हा परिषद इमारतीत उभारले आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरामध्ये ५० किलो ऑक्सिजनची साठवणूक क्षमता असली तरी प्रत्यक्षात मात्र २२.४ केएल ऑक्सिजन जिल्ह्यात उपलब्ध आहे. याशिवाय जम्बो ऑक्सिजन, ड्युरो सिलिंडर, रेग्युलर ऑक्सिजन सिलिंडर या माध्यमातूनही रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जातो. परंतु हे सिलिंडरही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. नवीन प्रकल्पाची उभारणी झाल्यास दररोज १० केएल ऑक्सिजन मिळणार आहे.