ग्रामीण भागात एसटी बसचा प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना ऊन, पावसात महामार्गावर ताटकळत उभे राहावे लागू नये, यासाठी आमदार, खासदार निधीतून प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत. चार हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या ताडबोरगाव येथेही तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. ही बाब लक्षात घेता सन २००० साली आमदार निधीतून येथील प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. गेल्या वीस -एकवीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या निवाऱ्याची सध्या दुरवस्था झाली आहे. निवाऱ्यावरील पत्रे तुटले असून भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, तर प्रवाशांना आत बसण्यासाठी बांधलेले ओटे पूर्णतः उखडून गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना थांबण्यासाठी हा निवारा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे त्याचा वापर नागरिक केरकचरा टाकणे व लघुशंकेसाठी करत असल्याने प्रवाशांना उभे राहण्याची देखील सोय राहिलेली नाही. त्यातच सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने रुंदीकरणासाठी सर्व झाडांची कत्तल करण्यात आल्याने बसस्थानक परिसरात सावलीसाठी एकही झाड उरलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, वारा, पावसात बसची वाट पाहण्यासाठी रोडवरच ताटकळत उभे राहावे लागत आहे. विशेषतः महिला प्रवाशांचे यात मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ नवीन प्रवासी निवारा बांधण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
वीस वर्षांत दुरुस्ती नाही
वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या निवाऱ्याची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र, २० वर्षांत एकदाही बांधकाम विभागाने याची डागडुजी केलेली नाही. परिणामी, हा निवारा आता पूर्णतः मोडकळीस येऊन धोकादायक ठरत आहे.
नोकरीनिमित्त दररोज येथून अप-डाऊन करावे लागते. येथील निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने दररोज रोडवरच ताटकळत उभे राहून बसची वाट पाहावी लागते.
-निर्मला गायकवाड, नागरिक, ताडबोरगाव
गेल्या कित्येक वर्षांत निवाऱ्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे निवारा पूर्णतः मोडकळीस आला असून त्यामुळे प्रवाशांचे मात्र ऊन-पावसात हाल होत आहेत.
-सुभाष मोरे, नागरिक, ताडबोरगाव