तपासणी न करताच वाहनांची ये-जा
परभणी : शहरातील जिंतूर, वसमत, पाथरी व गंगाखेड रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी चौकी उभारण्यात आली आहे. मात्र, या चौकीतील अधिकारी व कर्मचारी फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी नागरिकांची तपासणी न करताच वाहतूक सुरू होती.
पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची मागणी
परभणी : पोलीस प्रशासन व ग्रामस्थांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिले जाते. गावातील भांडणे गावातच मिटविण्यासाठी पोलीस पाटील पुढाकार घेतात. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश गावांतील पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामस्थांचीही गैरसोय होत आहे.
धुळीमुळे वाहनधारक हैराण
परभणी : जिंतूर-परभणी या राज्य महामार्गाचे काम परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते परभणी शहरापर्यंत सुरू आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात संबंधित कंत्राटदारांकडून खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, नियमित पाणी मारत नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ या रस्त्यावर निर्माण झाली आहे. परिणामी, वाहनधारक त्रस्त आहेत.
गंगाखेड तालुक्यात २५१ घरकुलांची कामे
परभणी : पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत एक हजार ७३ पैकी केवळ २५१ घरकुलांची कामे गंगाखेड तालुक्यात पूर्ण झाली आहेत. त्यानंतर दोन वर्षे लोटली तरी ८२२ लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामासाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थी संतप्त आहेत.
अवैध वृक्षतोडीने पर्यावरणास धोका
गंगाखेड : लाकूड विक्रेत्यांकडून विनापरवाना दरदिवशी शेकडो झाडांची कत्तल केली जात असल्याचे गंगाखेड पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीतून दिसून येत आहे. अवैधरीत्या वृक्षतोड होत असतानाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.