लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शहरातील जैंदीपुरा मशिदीच्या इमारतीवर गंजलेला एक विजेचा खांब कोसळल्याची घटना ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, यावेळी वीज खांबावरील तारांमध्ये वीज प्रवाह सुरू होता. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. या घटनेने वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध शहरवासियांतून संताप व्यक्त केला जात आहे.शहरातील जुन्या भागात असलेल्या खुरेशी मोहल्ल्यातील जैंदीपुरा मशिदीजवळ असलेला विजेचा खांब शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कोसळून इमारतीच्या छतावर अडकला. यावेळी वीज तारांमध्ये विद्युत पुरवठा सुरू होता. काही सतर्क नागरिकांनी घटनेची माहिती तत्काळ वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास कळविल्यानंतर वीज पुरवठा बंद करण्यात आला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा खांब मशिदीच्या इमारतीवर तसाच धोकादायक पद्धतीने अडकलेला होता. जैंदीपुरा गल्लीत जाफर भाई गाडीवान यांच्या घराजवळ, भोईगल्ली तसेच खुरेशी मोहल्ला आदी भागात विजेचे खांब धोकादायक झाले आहेत. हे खांब बुडातून गंजल्याने ते कोसळून केव्हाही धोका निर्माण होऊ शकतो. हे खांब त्वरीत बदलावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी वारंवार केली. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
परभणी: गंजलेला खांब इमारतीवर कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:17 IST