- प्रमोद साळवेगंगाखेड : तालुक्यातील टाकळवाडी ते पांगरी फाटा या अवघ्या दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी सलग तीन दिवस आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. रविवारी भरपावसात ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर सोमवारी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्सप्रेस हायवे’ असे प्रतिकात्मक नामकरण करून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र या दोन्ही आंदोलनांकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने बुधवारी ग्रामस्थांनी तिरडीसह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आक्रोश व्यक्त केला.
दीड किलोमीटरचा रस्ता असूनदेखील गेल्या ७५ वर्षांत तो तयार झाला नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्ता नसल्याने टाकळवाडी व परिसरातील ग्रामस्थांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. पावसाळ्यात चिखल तुडवत शाळकरी मुलांना शाळेत जावे लागते, तर आजारी रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणे कठीण होते. वृद्ध, महिला, दिव्यांग यांची तर सर्वाधिक हालअपेष्टा होत आहेत. या सर्व त्रासामुळेच ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस उफाळून येत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या प्रश्नाबाबत पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, एसडीएम, तहसीलदार यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आंदोलनाची उघड उपेक्षा होत असल्याने आज आम्ही शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली आहे.
रस्त्याच्या प्रश्नासाठी सुरू झालेल्या या लढ्यात प्रत्येक आंदोलनात ग्रामस्थांची संख्या वाढताना दिसून आली. पहिल्या दिवशी ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन केले. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी महिला, बालके, वृद्ध, दिव्यांग यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. ग्रामस्थांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने या रस्त्याचे काम हाती घेतले गेले नाही तर पुढील काळात हे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल. शांततेत केलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून प्रशासन व लोकप्रतिनिधी मोठी चूक करत असल्याची टीकाही ग्रामस्थांनी केली आहे.