परभणी : कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडच्या संख्येनुसार जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होत असून सोमवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवे संबंधित सर्व दुकाने तसेच अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य स्तरावर निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्के असून ऑक्सिजन बेडची व्याप्ती १६ टक्के असल्याने जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदी शिथिल करण्याचे आदेश रविवारी दुपारी काढले.
या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या काळात सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेसह संबंधित सर्व दुकाने दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता असलेली दुकाने शनिवार, रविवार बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद राहतील. रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेवर सुरू सुरू राहणार असून शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मैदाने, खाजगी आस्थापना कार्यालये, शासकीय कार्यालय, खेळाची मैदाने, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के आसन क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. लग्नसमारंभासाठी ५० जणांची आणि अंत्यविधीसाठी २० जणांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. व्यायाम शाळा, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहेत.
दोन महिन्यानंतर खाजगी वाहतूक सुरूजिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे तब्बल दोन महिन्यानंतर खाजगी वाहतूक सुरू करण्यास तसेच आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रवास करीत असताना केवळ टप्पा क्रमांक पाचमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी संबंधितांना ई पास घेणे आवश्यक राहणार आहे. एसटी महामंडळाची बससेवा ही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केवळ प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. मालवाहतूकही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.