- विनायक देसाईपूर्णा (जि. परभणी) : पूर्णा तालुक्यातील कळगावामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे काही ठिकाणीच पंचनामे केले जात असल्याने संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी मंगळवारी थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून अधिकाऱ्यांच्या टेबलावर खराब झालेली सोयाबीन, कापसाच्या झाडांचा ढीग घातला. यावेळी सरसकट पंचनामे करण्याची मागणी करत घोषणा देण्यात आल्या. यानंतर या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा जिल्हाकचेरीकडे वळविला, तेथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांनी व्यथा मांडली.
कळगावात १५ ऑगस्टला झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शिवारातील पिके पाण्याखाली गेली. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. पाण्यामुळे सोयाबीनच्या झाडाला पालाच शिल्लक राहिला, शेंगा गळून गेल्या. कापूस पीक आडवे झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, या पिकांच्या नुकसानीचे त्रिस्तरीय समितीकडून पाहणी केली जात आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या पिकांचेच पंचनामे केले जात आहेत. असा आरोप करत मंगळवारी तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय गाठत सरसकट पंचनाम्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या सोयाबीनची झाडे कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात टाकून घोषणाबाजी केली. यावेळी सुरेश सूर्यवंशी, संदीप वाव्हळे, शिवाजी सूर्यवंशी, अतुल देवकते, भानुदास सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, असिफ शेख, पुंडलिक सूर्यवंशी, पांडुरंग पवार, ओम प्रकाश देवकते, देवीदास वाघमारे, रंगनाथ कदम आदींसह कळगावातील शेतकरी उपस्थित होते.
जिल्हा कचेरीत पऱ्हाट्या घेऊन शेतकरीपूर्णा तहसील, तालुका कृषी कार्यालयास निवेदन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा जिल्हा कचेरीकडे वळत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, कापसाची झाडे घेऊन शेतकरी दाखल झाले. यावेळी जिल्हा कचेरीबाहेर शेतकऱ्यांनी घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.