- तुकाराम सर्जेबोरी (जि.परभणी) : जिंतूर तालुक्यातील जुना चांदज येथील स्मशानभूमीमध्ये काही जणांनी एकत्र येत गुप्तधनाच्या आमिषाने चक्क पाच ते दहा फूट खोल खड्डा खंदला. या सर्वांनी संगणमत करुन विविध प्रकारचे साहित्य आणून तेथे अघोरी कृत्य केले. हा सर्व प्रकार बोरी पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता उधळून लावला. यामध्ये एकूण ८ जणांना ताब्यात घेत बोरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना पुढील कारवाईत नोटीस बजावत गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जुना चांदज येथे स्मशानात काही जण मध्यरात्री एकत्र आल्याची माहिती बोरी पोलिसांना मिळाली. त्यावरुन सपोनि. सुनील गोपीनवार यांच्यासह पथकाने या गावात धाव घेतली. तेथे हा प्रकार समोर आला. पोलीस कर्मचारी प्रकाश लिंबाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेख खाजा शेख यासीन (रा.रामेश्वर नगर, परभणी), पुरुषोत्तम शंकरराव पद्मगीलवार (रा.नवा मोंढा रोड, परभणी), संतोष ज्योतीराव घोडसे (रा.कारेपूर, ता.रेणापुर), उद्धव पांडुरंग सुमुकराव (रा.महाळाई, ता. चाकूर), विठ्ठल तुळशीराम जाधव (माहाळाई, ता.चाकुर), जमीर खान आमिर खान (रा.जैतापुर, ता.पाथरी), शेख अन्वर शेख अब्दुल गनी (जैतापूर, ता.पाथरी), इब्राहिम खान अजिज खान (रा.आठवडी बाजार,पाथरी) वरील आरोपींनी संगणमत करून २५ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास जुने चांदज येथील गावठाणच्या स्मशानभूमीमध्ये मिळून आले व त्यांच्यासोबतचे गुप्तधन करण्याचे साहित्य जमा करण्यात आले. असेच तंत्र मंत्र विद्या करून ते खड्डा खोदत असताना आढळून आले. त्यांच्यावर बोरी पोलिस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जादूटोणा अघोरी प्रतिबंधक अधिनियम २०१३ कायद्यांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.एन.थोरवे, जमादार दिलावर खान तपास करत आहेत.