परभणी येथील एमआयडीसी भागात नव्याने उभारलेल्या खासगी ऑक्सिजन प्लांटला पूर्वी चाकण येथून लिक्वीड ऑक्सिजन देण्यात येत होता. नंतर त्यात बदल करून हैदराबाद येथून हे लिक्वीड ऑक्सिजन देण्याचा निर्णय मुंबईतून झाला. त्यानुसार मंगळवारी हैदराबाद येथून १६ टन लिक्वीड ऑक्सिजन घेऊन एक टँकर परभणी शहराकडे निघाला होता. तो नांदेडमार्गे परभणीला येण्याऐवजी बुधवारी सकाळी लातूर येथे नेण्यात आला. संबंधित टँकरचालकावर राजकीय व प्रशासकीय दबाव टाकून हा टँकर लातूरला नेल्याची चर्चा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या बैठकीत झाली; परंतु याबाबत जाहीर चर्चा मात्र करण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत खाजगीत कबुली दिली. परिणामी, परभणीकरांचा हक्काचा ऑक्सिजन बुधवारी मिळू शकला नाही. आता कर्नाटकातील बेल्लारी येथून हा ऑक्सिजन देण्याचा निर्णय झाला आहे.
नगरच्या मंडळींनीही यापूर्वी मारला होता डल्ला
परभणीला यापूर्वी पुणे येथील चाकणमधून लिक्वीड ऑक्सिजन देण्यात येत होते. साधारणत: महिनाभरापूर्वी अहमदनगरमार्गे परभणीला लिक्वीड ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर अहमदनगर शहरात अडविण्यात आला. तेथे टँकरमधील १६ पैकी ८ टन ऑक्सिजन काढून घेण्यात आले. नंतर ८ टन ऑक्सिजनसह हा टँकर पाठवून देण्यात आला. राजकीय दबावातून हा प्रकार घडल्याने याची कोठेही फारशी वाच्यता झाली नाही.