परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प परभणीसाठी १८ एप्रिल रोजी मंजूर झाला होता. त्यानंतर आता महिनाभराच्या कालावधीत तो कार्यान्वित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातून दररोज २८० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्माण होणार आहे. या प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती करण्यास काही दिवसांपूर्वी प्रारंभ झाला होता; परंतु अन्न व औषधी प्रशासन विभागाने तयार झालेला ऑक्सिजन रुग्णांना वापरायोग्य आहे की नाही, याची पनवेल येथील प्रयोगशाळेकडून तपासणी करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रयोगशाळेने तयार केलेल्या ऑक्सिजनचे नमुने ३ वेळा तपासण्यासाठी नेले होते. तिन्ही नमुन्यांच्या तपासणीअंती परभणीतील प्रकल्पातून तयार होणाच्या ऑक्सिजनची प्युअरिटी ९३.०८ टक्के असल्याचे स्पष्ट झाले. या प्रयोगशाळेने हा ऑक्सिजन रुग्णांना वापरायोग्य असल्याचा अहवाल गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर शुक्रवारपासून तो प्रत्यक्ष रुग्णांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली.
परभणीत जिल्हा परिषदेचा ऑक्सिजन प्रकल्प सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST