जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत तब्बल १६ हजार ६१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दररोज ५०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शिवाय रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही २.५१ टक्के आहे. ही आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार केले तर त्यांच्याकडून होणाऱ्या प्रसारावर प्रतिबंध लावता येऊ शकतो. हे अत्यंत महत्त्वाचे काम असल्याने यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याची माहिती मनपा किंवा स्थानिक प्रशासनास देण्याचे काम या शिक्षकांचे आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत बाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण फक्त ७.०१ टक्के आहे. १६ एप्रिलच्या अहवालानुसार जिल्ह्यात २३ हजार ५०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. या रुग्णांच्या संपर्कातील १ लाख ६४ हजार ८७० लोकांचा शोध घेण्यात आला. हे प्रमाण ७.०१ टक्के आहे. यामध्ये प्रशासकीय यंत्रणेला वाढ करावी लागणार आहे. तरच कोरेानाचा फैलाव रोखण्यात यश येईल.
रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे प्रमाण फक्त ७ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST